
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी आज (२ मे २०२५) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित ‘वरिष्ठांचा सम्मान’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टलचे उद्घाटन, वर्च्युअल माध्यमातून वृद्धाश्रमांचे उद्घाटन, सहायक उपकरणांचे वितरण आणि सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग व ब्रह्मकुमारी संस्थेच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या प्रसंगी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले की, आई-वडिलांचा व वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. बहुतेक घरांमध्ये मुले आपल्या आजी-आजोबांबरोबर अतिशय मोकळेपणाने वावरतात. वृद्ध सदस्य हे कुटुंबासाठी भावनिक आधारस्तंभासारखे असतात. जेव्हा वृद्ध लोक आपले कुटुंब समृद्ध होताना पाहतात, तेव्हा त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य, प्रेरणा आणि मार्गदर्शन ही गोष्ट तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेची आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेले अनुभव आणि ज्ञान हे तरुणांना गुंतागुंतीच्या आव्हानांचा सामना करण्यास मदत करू शकते. त्यांनी असेही सांगितले की, वृद्धावस्था ही स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करण्याची, आपल्या जीवनाचे व कृतींचे आत्मपरीक्षण करण्याची व अर्थपूर्ण जीवन जगण्याची संधी असते. आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम वृद्ध नागरिक देश आणि समाजाला अधिक समृद्धी व प्रगतीकडे नेऊ शकतात.
राष्ट्रपतींनी म्हटले की, ज्येष्ठ नागरिक हे भूतकाळाचे दुवे आणि भविष्याचे मार्गदर्शक आहेत. एक राष्ट्र म्हणून आपली ही सामूहिक जबाबदारी आहे की, आपण हे सुनिश्चित करावे की आपल्या वृद्ध नागरिकांचे जीवन सन्मानपूर्वक व सक्रीयतेने व्यतीत होईल. त्यांना आनंद वाटला की सरकार विविध उपक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवत आहे जेणेकरून ते त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात सक्रीय सहभाग घेऊ शकतील. शेवटी, राष्ट्रपतींनी सर्व नागरिकांना आवाहन केले की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद व कल्याणासाठी स्वतःला समर्पित करावे, त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व द्यावे आणि त्यांच्या अमूल्य संगतीचा लाभ घ्यावा.