
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक यादीची अचूकता सुधारण्यासाठी आणि नागरिकांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने नवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजना मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांनी मार्च महिन्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत आखलेल्या उपक्रमांशी सुसंगत आहेत.
आयोग आता निवडणूक मतदार नोंदणी अधिनियम, 1960 च्या नियम 9 आणि 2023 मध्ये सुधारणा केलेल्या जन्म व मृत्यू नोंदणी कायदा, 1969 च्या कलम 3(5)(b) नुसार, भारताच्या महानिबंधकांकडून मृत्यू नोंदणीचा तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळवेल. यामुळे निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांना नोंदणीकृत मृत्यूंची माहिती वेळेवर मिळेल. याशिवाय, बूथ स्तरावरील अधिकारी (बीएलओ) यांना फॉर्म 7 अंतर्गत औपचारिक विनंतीची वाट न पाहता, प्रत्यक्ष भेटींद्वारे माहितीची पुनर्पडताळणी करता येईल.