
पुणे – शंतनु कुकडे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठं वळण! कुकडेचा जवळचा चार्टर्ड अकाउंटंट रौनक जैन यांच्या बँक खात्यावरून माजी नगरसेवक दीपक मानकर आणि त्यांचा मुलगा अमोल मानकर यांच्या खात्यांमध्ये सुमारे पावणेदोन कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आयकर विभाग आणि ईडीला (ED) तपासासाठी पुणे पोलिसांनी अधिकृत पत्र दिल्याचं वृत्त आहे.
शंतनु कुकडेवर याआधीच आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रं आणि बोगस व्यवहारांच्या माध्यमातून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. आता या प्रकरणात राजकीय नेत्यांचे बँक व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.
या प्रकरणात नाव येताच, दीपक मानकर यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, “रोकड स्वरूपात कोणतेही व्यवहार केलेले नाहीत. हे व्यवहार व्यवसायिक आहेत आणि त्याची सर्व कागदपत्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत.” मात्र, खात्यात आलेली रक्कम, ती कोणत्या कारणाने आली, हे अद्याप सुस्पष्ट झालेलं नाही.
या सगळ्या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ED आणि आयकर विभाग आता या पैशांच्या मूळ स्त्रोताचा शोध घेणार असून, मानकर कुटुंबीयांना लवकरच चौकशीसाठी समन्स दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता आहे.
ही रक्कम शंतनु कुकडेच्या फसवणूक रॅकेटचा भाग होती का? की अन्य काही कारण होतं? हे आगामी तपासातून स्पष्ट होईल.